श्लोक २
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम् =
व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम् = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा =
पाहून, तु = आणि, आचार्यम् = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य =
जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम् =
असे वचन, अब्रवीत = बोलला ॥ १-२ ॥
अर्थ-“संजय म्हणाले-तेव्हा पांडवांनी केलेली व्यूहरचना पाहून
दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जाऊन म्हणाला”
स्पष्टीकरण- दुर्योधनाचा उन्मत्तपणा आणि वडिलधाऱ्यांचा अपमान करण्याची
वृत्ती इथेपण स्पष्ट दिसते. पांडवांची सेना आणि त्यांनी केलेली व्यूहरचना पाहून वास्तविक
पाहता त्याने कौरवसेनेचे सेनापती पितामह भीष्माचार्यांकडे जाणे अपेक्षित होते.पण भीष्म
लढत जरी आपल्या म्हणजेच कौरवांच्या बाजूने असले तरी त्यांच्या मनात पांडवांविषयी अपार
प्रेम आहे हे दुर्योधन पक्कं ओळखून होता. म्हणून त्याचे मिंधे असणाऱ्या द्रोणाचार्यांकडे
जाऊन सल्लामसलत सुरु केली. संपत्ती असणारे अहंकारी लोक हेच करतात. लोकांना मिंधे करून
ठेवतात.म्हणजे उपकारांच्या ओझ्याने ते इतके दबून जातात की जन्मभर स्वतःचा स्वाभिमान
ते अशा लोकांच्या चरणी गहाण ठेवतात. दुर्योधन हि व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे जी
आजकाल सर्वत्र पाहायला मिळते. आपल्या आजूबाजूला सहज नजर टाकली तर अनेक दुर्योधन आणि
त्याहून अधिक द्रोणाचार्य, कृपाचार्य व भीष्माचार्य पहावयास मिळतील.
टीप- संजय हे महाभारतातील रहस्यमयी व्यक्तींपैकी एक ! ते गवल्गण ऋषींचे
पुत्र होते. मुळचे सूतपुत्र पण महर्षी वेद्व्यासांकडे जाऊन त्यांनी वेदाध्ययन करून
धृतराष्ट्राच्या सभेत मंत्रिपद प्राप्त केले. हे स्वतःच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध
होते. वेळोवेळी शकुनीच्या कुटकारस्थानापासून दुर्योधनास परावृत्त करण्याविषयी सल्ले
दिले होते! सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान श्रीविष्णूंचे विश्वरूप दर्शन ज्यांना घडले
त्यापैकी हे एक महद्भाग्यवान! त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा गीतेत देखील दिसून येतो. आपले
नित्यकर्म भावनेवर आधारित नसून ते कर्तव्याला स्मरून असावे ! त्यासाठी प्रसंगी वाईटपणा
आला तरी हरकत नाही. पण पुढे त्या गोष्टींचे होणारे गंभीर परिणाम वेळीच निदर्शनास आणून
देणे हे मंत्र्याचे आद्यकर्तव्य असते!
आपण व्यवहारात देखील एखादी चुकीची घडत असलेली गोष्ट थोडसं धाडस करून सर्वांच्या नजरेत
आणून द्यावी. त्यावर कृती काय करायची हा ज्याचा त्याचा वैक्तिक विषय! पण जेव्हा निर्णायक
क्षण येईल तेव्हा अमुक गोष्ट मला माहितच नव्हती,असे कोणीही म्हणणार नाही. श्रीमद्भगवद्गीता
हा केवळ धार्मिक ग्रंथ नव्हे तर ती एक आदर्श आचारसंहिता आहे. जीवनात मानसिक द्वंद्वे
नेहमीच होतात. निर्णय काय घ्यावा? कुणी दुखावले तर जाणार नाही ना? अशा भावनिक गुंत्यात
अडकतो! थोडक्यात काय तर आपलेच आपल्याशी युद्ध सुरु असते. ह्यात विजयश्री प्राप्त करायची
असेल तर गीता हि तारुण्यातच वाचली गेली पाहिजे. युद्ध संपल्यावर युद्ध कसे करावे हे
वाचून काय उपयोग?
साधारण इंग्रज राजवटीच्या काळापासून समस्त भारतात एक अंधश्रद्धा पसरवली गेली ती आजतागायत
कायम आहे. ही अंधश्रद्धा म्हणजे “ धर्मग्रंथ हे म्हातारपणी वाचायचे असतात.”
आणि हीच अंधश्रद्धा आपल्याला अज्ञानाच्या आणि परावलंबीत्वाच्या गर्तेत ढकलते. जगातील
सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आणि आदर्श जीवनपद्धती असलेल्या राष्ट्रात दैनंदिन निर्णय घेण्यासाठी
आपल्याला आपला मेंदू हा कुणाकडेतरी गहाण टाकावा लागतो या सारखी शोकांतिका नाही. गीता
ही आचारसंहिता आहे. रहदारीचे नियम हे प्रवासाच्या सुरुवातीलाच माहित करून घ्यावे लागतात
म्हणजे अपघात होत नाहीत. तसंच मनुष्य जीवन प्रवासाच्या प्रारंभीच भगवद्गीतेचे वाचन
अपेक्षित आहे. जीवनप्रवास संपुष्टात आल्यावर रहदारीचे नियम वाचून काय फायदा याचा विचार
प्रत्येकाने करावा.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।